कोकणात येथे पाणी पेटते..!
कोकण म्हणजे एक आश्चर्यच आहे. याच कोकणात कुणी सांगितले पाणी पेटते आहे. आमच्या इकडे केवळ पाण्याचे झरेच झुळझुळ वाहत नाहीत तर गरमा-गरम पाणी खळखळत असते. गरम पाण्याच्या स्नानासाठी तुम्हाला धावाधाव करावी लागणार नाही. आमच्या येथे गरम पाण्याच्या नद्याच झुळुझुळु वाहत असतात. कितीही तास स्नान करा आणि कधीही या, तुमच्यासाठी वर्षाचे बाराही महिने आमची सेवा चोख आहे.?असे आमच्या मुलखातल्या ‘उन्हवरे’ गावच्या माणसाने सांगितले. तर आश्चर्यचकित होऊ नका. तो आपल्या शब्दाला मागे येणार नाही. कारण या गावात उकळते पाणी असलेली नदीच आहे.?याचा मुख्य जलस्रोत तर सदानकदा रटरटतच असतो. येथील पाण्याचे तापमान आहे ७० अंश सें.पेक्षा अधिक! निश्चितच कुठेतरी आग धगधगत असणार असे सर्वानाच वाटेल; पण असा कोणताही अग्नी प्रज्वलीत नाही. तरीही येथे अविरत गरम पाणी वाहते आहे. येथे अंडे सहज पाण्यात सोडावे आणि उकडलेले अंडे थेट खायला घ्यावे, वस्त्रात गुंडाळलेली तांदळाची पुरचुंडी या पाण्यात काही मिनिटं ठेवावी म्हणजे स्टीम राईस तयार.. ही निसर्गाची नवलाई अनुभवायची तर दापोली ते मंडणगड असा प्रवास करायला हवा. येथील फरारीच्या खाडीची परिक्रमा करायला हवी.
गरम पाण्याचा जलस्रोत पाहणे म्हणजे धगधगत्या अग्निकुंडात पोहोचण्यासारखेच आहे. येथे म्हणे दिवसरात्र पाणी पेटत असते. भूगर्भातील या आश्चर्याने ‘ऊन्हवरे’ गावाला सुखी केले आहे. या गावातील कोणाही व्यक्तीला त्वचाविकार नाही. असे छातीठोकपणे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. तेव्हा गावाचा अभिमान वाटतो.
खरं तर गरम पाण्याचे झरे अनेक ठिकाणी असल्याची आपल्याला माहिती असेल; पण दापोलीतील ‘उन्हवरे’चा हा जलस्रोत दिवसरात्र रटमटत असतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण झरा असे याला म्हणावे लागेल. येथील पाणी एवढे गरम आहे की, त्याचा फटका सामान्यांना बसू नये यासाठी भोवताली भिंत बांधून कुंड स्वरूपात बंदिस्त करण्यात आले आहे. कोकणचा प्रदेश श्रद्धेने भारलेला आहे. यामुळे पेटत्या पाण्याला दंडवत घालणारी मंडळी कमी नाहीत. हे स्थान आता पर्यटनस्थळ म्हणून गजबजले आहे. महाराष्ट्रात विविध भागांत ३२ ठिकाणी गरम पाण्याचे झरे जागृत असल्याची माहिती मिळते. त्यापैकी आठ जलस्रोत राज्याच्या पठारी भागात म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यात तर उरलेले सर्व जलस्रोत कोकणात आढळतात.
कोकणची वैशिष्टय़पूर्ण भूशास्त्रीय रचना व इतिहास यास कारणीभूत आहे. कोकणातील उन्हवरे नकाशावर पाहिल्यास ते एका जवळपास सरळ रेषेत उत्तर-दक्षिण असल्याचे दिसते. कारण उत्तर-दक्षिण असलेल्या भ्रंशरेषेला धरून हे उन्हाळे आहेत. सातवली ,उन्हेरे पाली (गणपती),सव मुंबई-गोवा महामार्ग महाडजवळ जिथे सावित्री नदीला खेटून जातो तिथे नदीपल्याड जो हिरव्यागार देवराईसारखा परिसर दिसतो तिथे गरम पाण्याची कुंडे आहेत.
तुम्हाला कोणी विचारले की, पाणी आग ओकू शकते काय? तर ‘उन्हवरे’ गावात पोहोचल्यावर हे आश्चर्य अनुभवायला मिळते. यासाठी खेड-दापोली रस्त्यावर पन्हाळे काजी लेण्याकडे जाणारा रस्ता धरावा. पुढे या रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडील फाटा पन्हाळेकाजी लेण्याकडे जातो. डावीकडचा उन्हव-याकडे जातो. रस्ता पुढे पुढे उतरताना आपण फरारीच्या खाडीवर पाहोचतो. येथे दुरूनच कुठेतरी आग लागल्याचा भास होतो. जमिनीतून वाफा बाहेर पडत असल्याचे अपूर्व दृश्य दिसते. आपली उत्सुकता वाढते. कधी एकदा येथे पाहोचतो असे होऊन जाते.
मूळ स्रोत असणारे कुंड रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे. येथील पहिल्या कुंडातील तापमान ७० अंश सें.ग्रे.पेक्षाही अधिक. हात घातला तर भाजून जाईल. त्यामुळे या कुंडाकडे सावधतेने जायला हवे. वाफेची धग दुरूनही जाणवते. याच कुंडातले पाणी एका चरातून दुस-या कुंडात नेले आहे. तापमान कमी असल्याने तेथे स्नानाचा आनंद घेता येतो.
गाववाल्यांनी अलीकडेच येथे महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी सोय केली आहे. मुख्य कुंडातून स्रवणारे गरम पाणी आसपासच्या सुमारे एक एकर परिसरात पसरत असल्याने गरम चिखलयुक्त पट्टा तयार झाला आहे. या चिखलात अधूनमधून गाई- गुरे रुतून बसतात व मृत्यूला सामोरी जातात. गरम कुंडाचे पाणी फरारीच्या खाडीला जेथे मिळते तेथे पाण्याचे तापमान ४० अंश सें.ग्रे. एवढे आहे. त्याच्या थोड्या वरच्या अंगाला पाण्याचे तापमान ३५ अंश सें.ग्रे. आहे. अशा गरम पाण्यातही शंख-शिंपले, मासे फिरताना पाहून आश्चर्य वाटते. जणूकाही माशांना या धगीचे काहीच वाटत नसावे.
गंधकयुक्त अशा पाण्यामध्ये त्वचारोग बरे करण्याचे गुणधर्म आहेत. यासाठी येथे स्नानगृहेही बांधण्यात आली आहेत. या मुख्य स्रोतापासून काही अंतरावर चुकून जरी पाय ठेवला तरी पाय भाजतो. या परिसरात काही सरपटणारे प्राणी पोहोचले तर त्यांना मृत्यूशिवाय गत्यंतर नाही. या गरम पाण्यात गावातील सर्वच जण आंघोळीसाठी नित्यनेमाने येतात. गरम पाण्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून थंड पाण्याच्या जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने येथे पाणी सोडले जाते. उर्वरित पाणी पाटाने समुद्राच्या दिशेने सोडण्यात आले आहे.
मुख्य कुंडात अंडी उकडतात, मेलेली कोंबडी सोलण्यापूर्वी या पाण्यात बुडवून ठेवतात, नंतर ती सोलायला सोपी जाते, अशी माहिती येथील ग्रामस्थ सांगतात. या गरम पाण्यात फिरताना मिळणारी उब अनुभवायची, याचा मनस्वी आनंद घ्यायचा असेल तर येथे तांबडे फुटताना पोहोचायला हवे. म्हणजे या गरम पाण्याचा मनसोक्त आस्वाद आणि अनुभूती घेता येईल. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात गरम वाफेतील आंघोळ हा अनुभव थरारक असेल. या दिवसात गुलाबी थंडी अशी आंघोळ संस्मरणीय ठरेल.
दापोली-खेड रस्त्यावरून वाकवली येथे उजवीकडे वळून गावतळेमार्गे घाटरस्त्याने उन्हवरे गावात पोहोचता येते. उन्हवरे गाव दोन आहेत. एक दापोलीतले, दुसरे मंडणगडचे. दोन्हीही गावांमध्ये येणारा अनुभव सारखाच.
या रटमटणा-या आगीप्रमाणचे उन्हवरे (व्हाया पालवणी) मंडणगडकडून आतल्या रस्त्याने (पालवणी मार्गाने) दापोलीकडे जाताना जिथे भारजा नदी रस्त्याशी लगट करू पाहते तिथे नदीच्या डाव्या तिरावर चंडकाई, मुकाई आणि वळजाईची मंदिरे आहेत. या भागात परिक्रमा करायलाच हवी.
नदीकाठाने डोंगरी भागात पदभ्रमंती करताना मिळणा-या आनंदाचे वर्णन करायला शब्द कमी पडतील. येथील घनगर्द झाडीत भेटतो तो महाराष्ट्र वृक्ष म्हणून प्रसिद्ध पावलेला ताम्हण! याची वसाहतच येथे आहे. आतासा या भागात जांभळय़ा फुलांचा सडाच अनुभवायला मिळतो. ही उधळण बघून डोळे सुखावतात. या गुलाबी-जांभळय़ा फुलांवर वैविध्यपूर्ण पक्षी या हंगामात येथे स्थिरावतात म्हणे. या पक्षांचे गुंजन ऐकताना आपले अस्तित्व आपण विसरून जातो. पिवळय़ा पट्टय़ाचे राघू येथे पाहायला मिळतात. तर टिटवी आणि लाव्हे पक्षी येथे मुक्तपणे विहार करत असतात. अनेक छोटे-मोठे जीव येथे आकर्षित करतात. अलीकडे दुर्दैवाने या परिसरातील वृक्षराईची तोड होऊ लागली आहे.?या स्थळाचा ग्रामीण बाज तसाच जपून नवा आनंद गाववासीय घेऊ शकतात.

No comments:

Post a Comment